कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकरी बांधवांनी “आमचा कांदा आमचा दर” आंदोलन राज्यात सुरू केले आहे. aamcha kanda aamcha dar
कांद्याचे दर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी “आमचा कांदा आमचा दर” नावाचे एक आंदोलन सुरु केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारसमितीमध्ये या आंदोलनाची सुरुवात शेतकर्यांनी केली आहे. कांद्याचे दर हे शेतकऱ्यांनी ठरवावे, याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कांदा उत्पाकांकडून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. सध्या कांद्याचे दर बाजारातील परिस्थिती पाहून ठरवले जातात.आणि शेतकरी ज्यावेळी कांद्याचं उत्पादन घेतात त्यावेळी 1 किलोचे दर 5-7 रुपयांपर्यंत खाली येतात. व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर चार पाच महिन्यांनतर तेच दर 100 ते 150 रुपयांपर्यंत पोहोचतात. यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांना नुकसानाला सामोरे जावे लागते.
कांद्याला प्रती किलो 30 रुपयेचा दर मिळावा
महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्री भारत दिघोळे यांनी, “देश स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष साजरं करत आहे मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार मिळालेला नाही.”, असं म्हटलं आहे. सरकारनं कांद्याबाबत कोणतेही धोरण अजून ठरवलेलं नाही. गावागावांमध्ये जाऊन कांद्याची विक्री किमान आधारभूत किमतीवर व्हावी आणि शेतकऱ्यांमध्ये जागरुकता व्हावी म्हणून पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती, भारत दिघोळे यांनी दिली. कांद्याला 30 रुपये किलो दर मिळावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
शेतकरी कांद्याची साठवणूक का करू शकत नाहीत?
आर्थिक आणि वेगवेगळ्या समस्येमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बाजारसमितीमध्ये तात्काळ विकावा लागतो. कांदा साठवण्याची व्यवस्था कमी प्रमाणात असल्यानं कांदा उत्पादकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. एका गावामध्ये 100 शेतकरी असल्यास 10 शेतकऱ्यांकडेच कांदा साठवण्याची व्यवस्था आहे. सरकारकडून कांदा उत्पादकांना चाळ बनवण्यासाठी मदत दिली जाते. ही मदत फारच तोडकी असल्याचे भारत दिघोळे यांनी सांगतिलं.
हेही वाचा – कांदा आणेल शेतकर्यांच्या डोळ्यात पानी – कांद्याचे दर ५०० रुपयापर्यंत घसरले
25 टन कांदा साठवण्यासाठी चाळ बनवायची असल्यास तब्बल 4 लाख रुपये खर्च येतो. सरकार फक्त 87 हजार 500 रुपये देते, असं भारत दिघोळे म्हणाले. एका तालुक्यात 2 हजार शेतकऱ्यांनी सरकारी अनुदानासाठी अर्ज केल्यास 100 शेतकऱ्यांना लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कमी भावातच विकावा लागतो.
कांदा उत्पादनासाठी खर्च किती?
भारत दिघोळे यांनी National Horticulture Board 2017 च्या अहवालानुसार एक किलो कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी सरासरी 9.34 रुपये खर्च येतो, असं सांगितलं. आणि गेल्या चार वर्षात हा खर्च आता 15 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन होतं.